नवी दिल्ली – महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत येत्या 72 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश मंत्रालयाने दिले होते. दरम्यान, ब्रिजभूषण शरण आज दुपारी ४ वाजता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील नवाबगंज येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषद घेणार आहेत.
या परिषदेत आपल्याविरोधातील कटाचा पर्दाफाश करणार असल्याचे ट्विट ब्रिजभूषण यांनी केले आहे. दिल्ली ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीपटू जंतरमंतरवर बसले असून ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी या खेळाडूंनी केली आहे.
सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले. त्यांचे महिला खेळाडूंशी असलेले वर्तनही अत्यंत असभ्य आहे. ते सतत महिला खेळाडूंनाच लक्ष्य करत त्रासही देतात. त्यांनी महिला खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षक दिले नाहीत तसेच मोठ्या स्पर्धांच्या कालावधीतही आमच्या संघासाठी फिजीओ किंवा प्रशिक्षक नसतो, असे आरोप महिला कुस्तीपटू विनेश फोगटसह ऑलिम्पिक व राष्ट्रकुल स्पर्धा पदक विजेत्या अनेक महिला कुस्तीपटूंनी सिंह यांच्यावर केले आहेत.जंतरमंतरवर जमलेल्या सर्व खेळाडूंनी मागण्या मान्य होईपर्यंत न उठण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी कुस्तीपटू बबिता फोगट यांनी केंद्र सरकारच्या वतीने जंतरमंतरवर पोहोचून आंदोलक कुस्तीपटूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यासोबत बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेतली.या आंदोलनात बजरंग पुनियाही सहभागी झाला होता. कुस्ती संघटना विसर्जित व्हावी, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.यामुळे आता ब्रिजभूषण सिंह राजीनामा देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.