दोन ते तीन दिवसांमध्ये निवडणुकांची घोषणा होणार?

दिवाळीपुर्वीच विधानसभेसाठी मतदान होण्याची शक्‍यता
नवी दिल्ली: महाराष्ट्रासह हरयाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांत याचवर्षी विधानसभा निवडणुका होत असून प्रथम महाराष्ट्र व हरयाणात तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होतील.

महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांत मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधीच पूर्ण करण्याची योजना निवडणुक आयोग आखत आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्‍चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन नुकताच आढावा घेतला. त्यानंतर आज आयोगाच्या पथकाने हरयाणात जाऊन तेथील मुख्य निवडणूक आयुक्तांशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही राज्यांच्या गृह विभागांशी तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाशीही चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. 2014 मध्ये या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तर 15 ऑक्‍टोबर रोजी मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निकाल 19 ऑक्‍टोबर रोजी लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.