रांजणी, {रमेश जाधव} – राज्यातील विधानसभा निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत तस-तसे मतदार संघातील राजकिय वातावरण तापू लागले आहे.
शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदार संघावर महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गटाचे) आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे 35 वर्षे घट्ट पकड आहे
परंतु त्यांचे एकाकाळचे निकटवर्तीय व भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनीच वळसे पाटील यांना आवाहन दिले आहे.
महायुतीच्या उबाठा गटाचे सुरेश भोर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचेकडून रमेश येवले हे सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीला शिरूर लोकसभा मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव-शिरूरमधून 15000 मतांचे मताधिक्य मिळाले होते.
त्यात शिरुरच्या 42 गावांमधे वळसे पाटील यांचा करिष्मा चालला नाही, असे दिसून येते. त्यावेळी शिरुर लोकसभेची आंबेगाव-शिरुरच्या प्रचाराची जबाबदारी देवदत्त निकम, सुरेश भोर यांचेकडे होती.
दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या उर्जा, तंञशिक्षण, वैद्यकिय शिक्षण, अर्थ, कामगार, गृह अशा विविध खात्यांचे मंत्रीपद भूषवले आहे; परंतु शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात गेल्यावर प्रथमच वळसे पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत.
हा मतदार संघ हा भीमाशंकरपासून ते शिरुरची 42 गावे असा आहे. तसेच आंबेगाव तालुक्यातील मावळ पट्टा हा शरद पवार यांना मानणारा आहे.
अनेक ज्येष्ठ व्यक्ती की ज्यांनी शरद पवार यांचे बरोबर काम केले आहे. यावेळी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
दरम्यान निकम यांनी याच संधीचा फायदा घेत शरद पवार गटाचे काम सुरु केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असताना व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना अनेक शेतकर्यांशी थेट संबंध आहेत.
डिजीटल मार्केट कमिटी म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात मंचर बाजार समितीची ओळख निर्माण निकम यांनी केली.
दरम्यान अजून उमेदवारी निश्चित झालेली नसून जर वळसे पाटील व निकम यांच्यात थेट लढत झाल्यास आंबेगाव तालुक्यातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार व कुणाकडे आंबेगावचे नेतृत्व येणार या यसेत्या काळात स्पष्ट होईल.
दिलीप वळसे यांच्या जमेच्या बाजू
सहकार क्षेत्रावर मजबूत पकड.
भीमाशंकर कारखाना, शरद बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, देखरेख संघ, खरेदी-विक्री संघ तसेच अनेक सहकारी सोसायट्या ताब्यात
गेली 7 टर्म विविध खात्यांचे मंत्री असल्याने मजबूत विकासकामे
जुने सहकारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची मदत
कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा
देवदत्त निकम यांच्या जमेच्या बाजू
शरद पवार समर्थकांची साथ
ज्येष्ठ व्यक्ती व पवारांना मानणारा वर्ग
गेली अनेक वर्षे थेट जनतेत जाऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख
वळसे पाटील विरोधकांची मुठ बांधण्यात यशस्वी
आमदार रोहित पवार, डॉ. अमोल कोल्हे यांची मदत होऊ शकते