विरोधकांच्या धोरणांवर टीका करणार – गिरीश बापट

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेला उत्तर

पुणे – मी माझा टीकेचा स्तर कधीच खाली घसरू देणार नाही. वैयक्तिक चारित्र्यावर मीही आरोप करू शकतो; परंतु पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे. मी विरोधी पक्षाच्या धोरणांवर टीका करणार, अशा शब्दांत युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या वैयक्तिक टीकेला शुक्रवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

यावेळी खासदार अनिल शिरोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख महादेव बाबर, सेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित होते.

अन्य पक्षांनी काय टीका करावी हा त्यांचा प्रश्‍न आहे. परंतु, मी माझा स्तर खालच्या पातळीवर आणणार नाही. ही निवडणूक बापटविरुद्ध जोशी अशी नसून ती दोन विचारांची, पक्षाची निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणांवर मी टीका करणार, असे बापट म्हणाले.

शहरातील जवळपास 65 टक्‍के मतदार संघ फिरून झाला आहे. अन्य भागात प्रभागनिहाय प्रचारफेरीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांच्याही बैठका, नियोजन सुरू असल्याचे बापट यांनी सांगितले. पुणे शहराचा जाहीरनामा दोन-तीन दिवसांत तयार होईल. त्यानंतर तो जाहीर करू, असे बापट यांनी नमूद केले.

या नेत्यांच्या सभा होणार
नागपूर येथील मतदान संपल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुण्यात सभा घेण्यासाठी निमंत्रित केले आहे. याशिवाय, पियुष गोयल, पाशा पटेल, पंकजा मुंडे प्रचार सभेसाठी येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

प्रचार रथ आणि विजय गीताचे उद्‌घाटन
बापट यांच्या प्रचारार्थ विजय रथ, भीम रथ आणि दोन प्रचार गीतांचे शुक्रवारी उद्‌घाटन करण्यात आले. “वाजतय संबळ, फुलतंय कमळ’ आणि “यशसूर्याचे…’ या दोन्ही गीतांना दिग्विजय जोशी यांनी संगीत दिले आहे आणि हे गीत त्यांनी गायलेही आहे. पुणे शहरातील विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी या गीतांचा उपयोग होऊ शकेल. विजय रथाची योजना बहुउद्देशिय असून प्रचार फेरी, भाषणे, कोपरा सभांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. आणखीही टेम्पो आणि रथ तयार करण्याचे नियोजन असल्याचे बापट यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.