क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार – क्रीडामंत्री सुनील केदार

नागपूर : राज्यात क्रीडा विद्यापीठाची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार असून, त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंवर विशेष लक्ष देण्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. क्रीडा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, अमरावतीच्या क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, नागपुरचे प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड आणि विदर्भातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात क्रीडा संकुलात पायाभूत सुविधा वाढवून खेळाडूंच्या क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. विदर्भात अनेक कोळसा व सिमेंट कंपन्या असून, जिल्हा क्रीडा विभागाने त्यांच्याशी समन्वय साधत सीएसआर निधीतून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता यांनी व्यक्त केली. क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्तीमध्ये सातत्य ठेवताना क्रीडा विभागाने आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरु करणार असून, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अभिनव संकल्पना मांडाव्यात. क्रीडा विद्यापीठात खेळाडूंसह सहायक अधिकारी-कर्मचारी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथील क्रीडा संकुलात ‘साई’च्या धर्तीवर क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुल परिसरात असलेली सर्व कार्यालये एका छताखाली आणावीत. त्यामुळे परिसरातील जागेचा इतर क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना सराव करण्यासाठी उपयोग करता येईल, असे निर्देशही त्यांनी दिले.

येथील विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक, पॅव्हेलियन इमारत आणि वसतीगृहाची त्यांनी पाहणी केली. इंडोअर हॉल, सिंथेटिक ट्रॅक, पॅव्हेलियन इमारत, कुंपण भिंतीचे काम, जिल्हा नियोजनमधून वसतीगृहाचे काम, क्रीडा संकुलासाठी व्यवस्थापन देखभाल दुरुस्ती, सिक्युरिटी गार्ड, इलेक्ट्रिक बिल, पाणीपुरवठा याबाबत आढावा घेतला. तसेच विभागीय क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय क्रीडा विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. क्रीडा संकुल परिसरातील वॉटर लॉकींग सिस्टम, ड्रेनेज सिस्टम, रेन वॉटर हॉर्वेस्टींग कामाची माहिती तात्काळ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.