पराभवाचे आत्मपरीक्षण कॉंग्रेस करणार का?

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना तब्बल 3 लाख 24 हजार 608 मतांनी चीत करत विजय मिळविला. कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सलग दुसऱ्यांदा कॉग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. याची कारणे काय? याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ कॉंग्रेसवर आली आहे.

गिरीश बापट सहा विधानसभा मिळून 6 लाख 32 हजार 815 मते मिळाली. तर मोहन जोशी यांना 3 लाख 8 हजार 207 मते मिळाली आहेत. मोहन जोशी यांना जेवढी मते मिळाली त्यापेक्षा अधिक मतांची आघाडी बापट यांनी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव 64 हजार 793 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. बापट यांनी पुणे महापालिका नगरसेवकापासून सुरू केलेली यशस्वी घौडदौड खासदारकीपर्यंत येऊन पोहचली आहे. ते ही सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून. तर दुसरीकडे आत्तापर्यंत कोणत्याच निवडणुकीत विजयी न झालेले मोहन जोशी यांच्या पदरी आणखी एका पराभवाची नोंद झाली. पुण्यातून सलग दोनदा हार पत्करण्याची नामुष्की कॉग्रेसवर सन 1952 पासून पहिल्यांदाच आली. यापूर्वीच्या सलग 16 निवडणुकांत पुणेकरांनी एकदाही कॉंग्रेसला सलग दोनदा नाकारले नव्हते. शिवाय 2014 ची लोकसभा, विधानसभा, दोन वर्षांपूर्वीची महापालिका निवडणुकीतील समाधानकारक यश मिळवता आले नाही.

बापट यांच्या विजयामध्ये पक्षाचे संघटन, राबविण्यात आलेली निवडणूक यंत्रणा, बुथनिहाय रचनेने केलेले नियोजन महत्त्वाचे ठरले असून, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांमध्ये उसळलेली सुप्त लाटेने देशाचे चित्र बदलले. तर दुसरीकडे कॉंग्रेसने उमेदवारीच उशिरा जाहीर केल्यामुळे मतदारापर्यंत उमेदवार पोहचला नाही. पक्षाला आलेल्या मरगळीमुळे नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यामुळे बापट यांना विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गिरीश बापट यांचे अभिनंदन. आगामी वाटचालीसाठी यांना शुभेच्छा. कॉंग्रेस आणि आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी निवडणूक प्रचारात परिश्रम घेऊन विचारधारेची लढाई लढवली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. कार्यकर्त्यांच्या ऋणातच मी राहीन. पुण्याचा विकास कामात अग्रेसर राहणे आणि पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करणे ही माझी भूमिका यापुढेही राहील. आगामी काळात पुणे शहरात कॉंग्रेस पक्ष अजून बळकट केल्याशिवाय मी थांबणार नाही.
– मोहन जोशी, उमेदवार, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी, पुणे लोकसभा मतदारसंघ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)