भाजप स्वबळ आजमावेल? (अग्रलेख)

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या धुमाळीत आता रंगत भरू लागली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पातळीवरचे मातब्बर नेते फोडण्याची शिकस्त चालू आहे. त्यासाठी छापातंत्राचा येथेच्छ वापर सुरू आहे. या साऱ्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आता राज्यात स्वबळाचा नारा देऊ शकतो काय, या प्रश्‍नावर राज्याचे राजकारण येऊन ठेपले आहे. आजच एक बातमी प्रसृत झाली आहे. त्या बातमीने राज्यातील राजकारण्यांचे श्‍वास रोखले गेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक अंतर्गत सर्वेक्षण करून घेतले असून, त्यात या पक्षाला दीडशे जागा मिळू शकतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही बातमी जर खरी असेल, तर अर्थातच शिवसेनेचे भवितव्य अधांतरी लटकू शकते. भाजपला स्वबळाची उर्मी आलीच, तर त्यातून राज्याच्या राजकारणाचे अन्य संदर्भही बदलू शकतात.

अर्थात, ही बातमी खरी की “इलेक्‍शन स्ट्रॅटेजी’चा भाग म्हणून पेरलेली बातमी आहे, हे कळायला मार्ग नाही. भाजपच्या यशस्वी “इलेक्‍शन स्ट्रॅटेजी’ची जी एक “मोडस ऑपरेंडी’ आहे, त्यानुसार आधी विरोधकांची प्रमुख माणसे फोडायची; त्यातून आपल्याला अनुकूल वातावरण निर्मिती करायची, नंतर पक्षांतर्गत सर्वेक्षण नावाने स्वत:ला अनुकूल सर्व्हे करून, ते माध्यमांमध्ये प्रसिद्धीला द्यायचे; अशी सारी भाजपची पूर्वनियोजित रणनीती असते. आज प्रसिद्ध झालेली सर्वेक्षणाची बातमी हा त्याच रणनीतीचा भाग असू शकतो. क्षणभर हा सर्व्हे खरा आहे, असे मानले तर आता भाजप महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्याची आलेली नामी संधी गमावणार का? हा या घडीचा कळीचा प्रश्‍न ठरणार आहे.

जर स्वबळावरच स्पष्ट बहुमत मिळणार असेल, तर ती संधी गमावण्याचे कारण काय, असाही विचार आता भाजपमध्ये बळावू लागणे शक्‍य आहे आणि पक्षातला एक गट त्यासाठी आग्रही आहे, असेही या बातमीत म्हटले आहे. भाजपने हा निर्णय घेतलाच तर शिवसेनेची सर्वांत मोठी अडचण होणार हे स्वाभाविक आहे. भाजपच्या भूमिकेमुळे आयत्यावेळी स्वबळाचा नारा देण्याची वेळ शिवसेनेवरही आली, तर महाराष्ट्रात किती मजल मारता येईल याची शंका आहे. आणि जर हे दोन पक्ष वेगवेगळे लढले तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या आशाही पल्लवीत होऊ शकतात आणि त्यातून रोज सुरू असलेल्या पक्षांतरलाही ब्रेक लागू शकतो. एकुणातच निवडणुकीचा सारा रागरंगच भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेने पालटू शकतो.

राज्यभर पूर्ण अनुकूल वातावरण असेल, तर स्वबळाचा विचार भाजपने करण्यात काही चूक आहे, असे मानता येणार नाही. नाही तरी त्यांना शिवसेनेच्या नेहमीच्या अडेल भूमिकेमुळे वारंवार त्रासच सोसावा लागला आहे. तरीही नेहमी पडती भूमिका घेत भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाने शिवसेनेला गेल्या पाच वर्षांत सांभाळून घेण्याचेच धोरण ठेवले आहे. पडेल ती किंमत देऊन त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती टिकवून ठेवली होती.

शिवसेनेचे अन्य राजकीय लाडही भाजपने मोठ्या हौसेने पुरवले आहेत. शिवसेनेच्या मागणीनुसार लोकसभेचे जागावाटप होऊनही “किरीट सोमय्यांना उमेदवारी देऊ नका’, म्हणून शिवसेना अडून बसली होती. तेवढ्यावरून बिनसायला नको म्हणून भाजपने त्यांची तीही मागणी पूर्ण केली. त्या आधी भाजपने शिवसेनेला राज्याच्या सत्तेत योग्य तो वाटाही दिला. पण तरीही गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने सत्ताधारी पक्ष म्हणून जबाबदारीने वागण्याऐवजी सतत विरोधकांचीच भूमिका वठवली आहे.

अगदी थेट मोदींच्या कारभारावरही त्यांनी आपल्या मुखपत्रांतून आणि जाहीर कार्यक्रमांमधून कायम टीका केली आहे. तेही भाजपने सहन केले. आता केंद्रात भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली असल्याने आणि राज्यातही अनुकूल वातावरण लाभले असल्याने महाराष्ट्रात त्यांना स्वबळ आजमावून पाहण्याची उर्मी येणे पूर्ण स्वाभाविक आहे. आता प्रश्‍न हा प्रयोग ते करतील काय? हा आहे. त्यांच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मराठा आरक्षण कोर्टाच्या प्रक्रियेतही टिकल्याने आता भाजपच्या बाजूने पाच टक्‍के मते वाढली आहेत. त्या आधारे भाजप 288 पैकी 150 जागांचा पल्ला सहज गाठू शकेल, असे हा सर्व्हे सांगतो. मग इतकी अनुकूल स्थिती असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि प्रगत राज्यावर हुकूमत गाजवण्याची संधी का गमावायची, असा प्रश्‍न भाजपमधीलच एक गट विचारू लागला आहे, असेही या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

राज्यात स्वत:च्या पक्षाचे तब्बल 123 आमदार असताना विधानसभा निवडणुकीत केवळ 144 जागांवरच निवडणूक लढवण्याने भाजपला मोठाच घाटा सहन करावा लागणार आहे. या 288 जागा निम्म्या-निम्म्या वाटून घ्यायचे असे त्यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाच ठरले आहे, असे म्हणतात. चंद्रकांत पाटलांनीही असाच फॉर्म्युला ठरला आहे, याचा पुनरुच्चार वारंवार केला आहे. राज्यात मोठा प्रभाव असताना आणि स्वबळावर सरकार स्थापनेची नामी संधी उपलब्ध झाली असताना स्वत:हून आता राजकीय बळ कमी का करून घ्यायचे, असा भाजपमधील एका गटाचा रास्त प्रश्‍न आहे.

भाजपच्या या पक्षांतर्गत विचारप्रवाहाची चर्चा माध्यमांमध्ये उपस्थित करून, भाजपने आता ऐन मोक्‍यावर धूर्त खेळी खेळली आहे. त्यांचा हा धूर्तपणा लक्षात घेतला तर ते ऐनवेळी शिवसेनेला वाऱ्यावर सोडण्याची शक्‍यताच अधिक दिसते आहे. मागच्यावेळी 288 जागा लढवून 123 जागा पदरात पडल्या होत्या. आता केवळ 144 जागाच लढायला मिळणार असल्याने त्यात पक्षाचे बळ आपोआपच घटणार असल्याने भाजपचे नेते हा 144 जागांचा फॉर्म्युला सहजी मान्य करणार नाहीत, हे उघड आहे.

तथापि, हे करताना ज्या विश्‍वासाने त्यांनी शिवसेनेला लोकसभेच्यावेळी शब्द दिला आहे, तो बिनदिक्‍कतपणे मोडणे हाच एक मार्ग त्यांच्यापुढे आहे. हे धाडस करण्यास भाजपचे नेते धजावतील काय? या प्रश्‍नाच्या उत्तरात सारे इंगित दडले आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्याचा प्रयोग सुरू केला आहे, त्याला ब्रेक लावण्याची ही भाजपची खेळी आहे काय, की केवळ शिवसेनेला दबावात घेऊन त्यांच्याकडून अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठीची भाजपची ही खेळी आहे हे लक्षात येत नाही. या बातमीचे अन्वयार्थ काहीही असले तरी आता भाजपचे लोक राजकारणात पुरते माहीर झाले आहेत, त्याचेच हे लक्षण आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.