पटना – बिहारमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विधानसभेच्या ९४ जागांसाठी निवडणूक होणार असून राज्यातील जनता उद्या येथील उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये बंदिस्त करेल. दरम्यान, भगलपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असून येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भगलपूर विधानसभा मतदारसंघाची ओळख ही बऱ्याच काळापासून भाजपचा बालेकिल्ला अशी राहिला आहे. लालूप्रसाद यादव ९० च्या दशकात जेव्हा आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते, तेव्हाही त्यांना भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावता आला नव्हता. मात्र यंदा भगलपूरात भाजपसमोर विरोधकांच्या महाआघाडीसोबतच एनडीएमधून बाहेर पडलेल्या लोक जनशक्ती पक्षाचेही आव्हान असणार आहे.
बिहारमधील मोजक्याच जागांवर चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील ‘लोजप’ने भाजपविरोधात उमेदवार दिलाय. यापैकीच भगलपूर विधानसभा मतदारसंघ एक आहे. दलित व्होटर बेस असलेल्या लोजप यंदा राज्यात नवा राजकीय प्रयोग करताना दिसत आहे. पक्षाने विधानसभेसाठी दिलेल्या उमेदवारांपैकी बहुतांश हे कथित सवर्ण समाजातील असून स्थानिक राजकारणावर चांगली पकड असलेले आहेत.
भगलपूरात देखील चिराग पासवान यांनी अशीच खेळी खेळलेली दिसते. येथे पक्षातर्फे भाजपचे माजी नेते राजेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्मा हे मारवाडी समाजाचे आहेत. पासवान यांनी वर्मांना दिलेली उमेदवारी मतदारसंघातील परंपरागत जातीय समीकरणांना छेद देणारी ठरू शकते अशी कुजबुज राजकीय नेत्यांमध्ये आहे.
वर्मा हे व्यापारी समाजातील असून मतदारसंघात या समाजाचे चांगले संख्याबळ आहे. यामुळेच युवा नेते असलेल्या वर्मांचा भाजप प्रणित एनडीए आघाडीला फटका बसेल असं बोललं जातंय.
भगलपूर विधानसभेची जागा भाजपने १९९० पासून राखली होती. येथून पक्षाचे अश्विनी कुमार चौबे सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये येथे पोट निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा नितीश कुमार हे काँग्रेस, राजदसोबतच्या आघाडीत होते. याचा फटका बसल्याने भाजपला १९९० नंतर प्रथमच हार पत्करावी लागली. येथून काँग्रेसच्या अजित शर्मा यांनी विजय मिळवला. तेच सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
दरम्यान, यंदा भाजप – जेडी(यु) एकत्र लढत असले तरी ‘लोजप’च्या खेळीमुळे भगलपुरातील लढत तिरंगी झाली आहे. यंदा येथून अजित शर्मा (कॉंग्रेस), राजेश वर्मा (लोजप) व रोहित पांडे (भाजपा) यांच्यामध्ये प्रमुख लढत होईल. यानिमित्ताने भाजप यंदा काँग्रेसच्या हाती गेलेला भगलपूरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करू शकणार काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
भगलपुरात जेडी(यु)चा भाजपला छुपा विरोध?
काही दिवसांपूर्वी भगलपूरचे जेडी(यु) खासदार अजय कुमार मंडल यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये ते कार्यकर्त्याला भाजपचा प्रचार करू नका असेआदेश देत असल्याचं आढळलं होत. मात्र ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ती बनावट असल्याचा दावा केला होता. भाजप-जेडी(यु) मध्ये फूट पाडण्यासाठीच विरोधक असे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.