कर्नाटकमध्ये जेडीएस देणार भाजपला पाठिंबा ?

बंगळुरू:  कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. कारण सत्तेतून बाहेर झालेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्यात यावा, असी मागणी केली आहे.
जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना, येडियुरप्पा यांच्या सरकारला सरकारमध्ये सहभागी होऊन किंवा बाहेरून पाठिंबा देऊन समर्थन देता येऊ शकेल असे म्हटले आहे. मात्र या आमदारांनी अंतिम निर्णय कुमारस्वामी यांच्यावर सोडला आहे. तसेच ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले आहे. जेडीएसच्या आमदारांची शुक्रवारी बैठक झाली होती. त्यावेळी आमदारांच्या एका गटाने आपण विरोधी पक्षात बसावे आणि भाजपाच्या चांगल्या धोरणांचे स्वागत करावे असे सुचवले. मात्र चर्चेअंती सर्व आमदारांनी भाजपाला पाठिंबा देणे आणि सरकार वाचवणेच योग्य ठरेल, असे मत आमदारांनी व्यक्त केले. जेडीएसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत आम्ही पक्षासोबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत काही आमदारांनी सरकारला पाठिंबा द्यावा, असे मत मांडले. तर काही जणांनी विरोधी पक्षात बसावे, असे सुचवले, अशी माहिती जेडीएसचे नेते जी.टी. देवेगौडा यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.