मध्यप्रदेशात भाजपला आणखी हादरा बसणार?

कॉम्प्युटर बाबांनी उडवली राजकीय खळबळ

इंदूर: मध्यप्रदेशातील भाजपचे आणखी चार आमदार कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत, असा दावा कॉम्प्युटर बाबा या नावाने ओळखले जाणारे अध्यात्मिक गुरू नामदेव त्यागी यांनी गुरूवारी केला. त्यामुळे मध्यप्रदेशात मोठीच राजकीय खळबळ उडाली आहे. तो दावा खरा ठरल्यास भाजपला आणखी एक हादरा बसण्याची चिन्हे आहेत.

कर्नाटकमधील राजकीय उलथापालथीनंतर त्या राज्याची सत्ता भाजपच्या दृष्टीपथात आली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातही भाजपकडून सत्ता मिळवण्याच्या हालचाली केल्या जातील, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्या चर्चांना छेद देणारी घटना बुधवारी मध्यप्रदेश विधानसभेत घडली. एका विधेयकावर झालेल्या मतदानावेळी भाजपचे दोन आमदार कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे भाजपच्या ऐक्‍याला तडा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अशातच कॉम्प्युटर बाबांनी भाजपच्या टेन्शनमध्ये भर घालणारे वक्तव्य केले आहे. भाजपचे चार आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकारमध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा आहे, असे ते येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पत्रकारांच्या आग्रहानंतरही त्यांनी त्या आमदारांची ओळख उघड केली नाही. मुख्यमंत्री कमल नाथ यांनी सांगितल्यावर मी त्यांना तुमच्यापुढे आणेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॉम्प्युटर बाबा आधी माजी मुख्यमंत्री आणि शिवराजसिंह चौहान यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यातून मागील सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. मात्र, मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीआधी कॉम्प्युटर बाबा यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. आता त्यांना नव्या सरकारने नदी संरक्षण न्यासाचे अध्यक्ष बनवले आहे. त्यांचे राजकीय क्षेत्रातही मोठ्या संख्येने अनुयायी असल्याने त्यांच्या दाव्याला महत्व आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.