दौंडमध्ये आमदार कुल यांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार?

– संतोष गव्हाणे

पुणे -दौंड विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाकडे असल्याने येथे भाजपचाच आमदार असावा, याकरीता पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला जात आहे. यानुसार दौंड मतदार संघातून निवडणूक लढण्यास भाजपने तयारीही केल्याने राष्ट्रीय समाज पक्षात असलेले मात्र भाजपशी घरोबा झालेले विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात भाजप कोणता उमेदवार देणार? की, राहुल कुल रासप सोडून भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रवेश करणार, याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष असणार आहे.

राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू असताना भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे बहुतांशी मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट नाही. पुणे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. यातील दौंड तालुक्‍याबाबत तर नव्याने पेच निर्माण झाला आहे.

दौंड विधानसभा मतदार संघ हा भाजपकडे असल्याने या मतदार संघातूनही भाजपच्याच चिन्हावर उमेदवाराने निवडणूक लढवावी, असा हेका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लावला आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल कुले हे रासपमधून निवडून आलेले आहेत. राज्याच्या सत्तेतील भाजपचा घटक पक्ष असलेल्या रासपचे आमदार असल्याने राहुल कुल यांची मोठी क्रेझ आहे. रासपचे एकमेव आमदार म्हणून त्यांचे वलयही मोठे आहे. याच कारणातून त्यांनी दौंड तालुक्‍यातील भीमापाटस सहकारी साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांकडून विशेष कर्ज मिळविण्यापासून रस्ते, वीज, आरोग्य अशा मुलभुत घटकांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मतदार संघासाठी खेचून आणला आहे. कर्जमाफी तसेच मंत्रीपद नाकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील आमदारांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेले कुल यांनी लोकसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री फडणवीस तसेच भाजपच्या आदेशानुसार सौभाग्यवती कांचन कुल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले होते. यामुळे आमदार कुल हे रासप ऐवजी भाजपचे झाल्याचे जवळपास मानले जात होते. यातून त्यांना भाजपच्या गोटातही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, अशा स्थितीत आमदार कुल हे दौंड विधानसभा निवडणूक रासप पक्षाकडून लढविणार की भाजपकडून याबाबत तर्क-वितर्क सुरू असतानाच भाजपकडूनच याबाबत पेच निर्माण केल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

रासपऐवजी भाजपतून लढणार…
दौंडचे आमदार राहुल कुल हे 2014च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले असले तरी पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आमदार कुल यांना मंत्रीपदाबाबत दिलेले आश्‍वासन पाळले नाही. याशिवाय आमदार कुल यांनी स्वबळावर या मतदारसंघाचा विकास केला आहे. तसेच, समाज आरक्षणाच्या मुद्यावरही रासपकडून योग्य ते सहकार्य मिळाले नसल्याने हक्‍काचे मतही या पक्षापासून दूर जाण्याची शक्‍यता आहे. याच करणातून आमदार कुल रासपपेक्षा भाजपमधूनच निवडणूक लढविण्याची दाट शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.