पुणे – युवकांना एकत्रित करीत कार्यान्वित केलेली “वॉर रूम’, शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले “आपले सरकार’ सारखे व्यासपीठ, जलयुक्त शिवार माध्यमातून “दुष्काळमुक्त महाराष्ट्रा’कडील वाटचाल आणि पक्षाअंतर्गत व बाहेरील राजकीय विरोधातून यशस्वीपणे काढलेली वाट या बाबी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांपासून वेगळे बनवितात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस हे “डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने फर्गसन महाविद्यालयात झालेल्या एका चर्चासत्राच्या त्या बोलत होत्या. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली व विकासदृष्टी’ हा या चर्चासत्राचा विषय होता. या वेळी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. राधाक्रिष्ण पिल्लई, लेखक मयुरेश दिडोलकर, आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे अध्यक्ष अभिजित जोग उपस्थित होते.
श्वेता शालिनी म्हणाल्या, सामान्य नागरिकांपर्यंत सरकार पोहोचावे या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक “आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ आयडिया काढल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून दाखविली. गेल्या पाच वर्षांत नागरिकांनी ही बाब अनुभवली आहे. एखादा उपक्रम करायचा असेल, तर त्याचे बाह्यरूप नाही तर त्यामागील विचार महत्त्वाचा असतो. हाच विचार फडणवीस देताना दिसत आहेत.अभिजित जोग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिखा जैन यांनी आभार मानले.