ऑस्ट्रेलियाही कॉमनवेल्थवर बहिष्कार घालणार?

नवी दिल्ली – इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्या संदर्भातील भारताच्या भूमिकेनंतर ऑस्ट्रेलिया देखील या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची शक्‍यता आहे. 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा खेळ प्रकार वगळण्यात आल्यानंतर भारताने स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया देखील या स्पर्धेवर बहिष्कार टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शूटर्स यूनियन ऑस्ट्रेलियाकडून (यूएसयूए) राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्ण पदकासह एकूण नऊ पदक मिळवली होती. भारतानंतर ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होते.

एसयूएचे अध्यक्ष ग्राहम पार्क म्हणाले की, 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश करण्यासाठी इंग्लंडवर दबाव निर्माण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताला पाठिंबा द्यायला हवा. जर इंग्लंडने नेमबाजीचा समावेश केला नाही तर ऑस्ट्रेलियानेही स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, असेही ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.