जालना – देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कायद्याप्रमाणे शपथ घेतली आहे. तिघांना शुभेच्छा देतो. पण, आता नाटकबाजी बंद करावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरूवात करावी. 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असे मराठा समाजाचे नेते, मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करू, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांना शुभेच्छा आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरूवात करावी. समाजाला सांभाळायला शिका. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्ही जनतेचं मन जिंकण्याचे काम करा, असा सल्ला त्यांनी महायुतीच्या तीनही नेत्यांना दिला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, असे फडणवीस यांनी म्हटले असेल, तर चांगली गोष्ट आहे. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. समाज तुमचे अभिनंदन करेल. पण, आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे फडणवीस सरकार आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.