मुख्याधिकारी शंकर गोरे; प्रलंबित विकासकामांसाठी कृतिशील आराखड्याचे नियोजन
सातारा – प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाचा मेळ घालताना राजकीय समन्वय व प्रशासकीय चौकट यांचे कायमच भान ठेवावे लागते. साताऱ्यात शासकीय सेवेची तीन वर्षे पूर्ण करणारे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी गतीशील प्रशासन व विकासाभिमुख कामांचा पाठपुरावा हा नववर्षांचा संकल्प सोडत बायोमायनिंगचा प्रकल्प त्वरेने पूर्ण करण्याची ग्वाही “प्रभात’शी संवाद साधताना दिली.
प्रश्न – गेल्या तीन वर्षांत साताऱ्यात काम करताना काय अनुभव आले?
उत्तर – साताऱ्यात काम करणे हा उत्तम अनुभव आहे. अ वर्ग नगर पालिका असणाऱ्या सातारा पालिकेत कामाला प्रचंड वाव आहे. राजकीय नेतृत्वाच्या बरोबर काम करताना दबावाचा कोणताही अनुभव येत नाही. याउलट प्रशासकीय व विकास कामाचे निर्णय समन्वयाने व चर्चेने होतात. प्रशासन मुख्य या नात्याने माझीही बाजू अभ्यासपूर्ण पध्दतीने ऐकली जाते.
प्रश्न- नवीन वर्षाचा आपला प्रशासकीय संकल्प काय ?
उत्तर- सातारा पालिका स्वच्छ सुंदर अभियानासाठी गतवर्षीच्या 45 व्या स्थानापासून पहिल्या दहामध्ये येण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या समन्वयाने या अभियानासाठी जनजागृती, नागरिकांना तत्पर सेवा, रखडलेली अनुदाने व प्रकल्पांचा पाठपुरावा, चतुर्थ वार्षिक पाहणीचा बिघडलेला ताळमेळ संतुलित करणे व वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, 36 कोटीच्या थकबाकीची वसुली, वार्षिक भाडे अंदाजाच्या निश्चितीचा कालबद्ध कार्यक्रम हीच दैनंदिन कामे हा सातारकरांसाठी प्रशासन मुख्य या नात्याने नववर्षाचा संकल्प आहे. कर्मचाऱ्याची शंभर टक्के उपस्थिती राखणे दुसरा संकल्प आहे.
प्रश्न – सातारकरांना नवीन वर्षात कोणत्या कामाचे गिफ्ट मिळणार ?
उत्तर – माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांनी युती शासनाच्या काळात कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांचे पूर्णत्व करणे महत्वाचे आहे. ग्रेड सेपरेटर मार्च 2020 अखेर सातारकरांच्या सेवेत दाखल होईल. कास धरणाच्या प्रलंबित देयकांचा प्रस्ताव नगर विकास विभागाला देण्यात आला आहे. कास धरण उंचीमुळे साताऱ्यासह बावीस गावांना एक टीएमसी पाणी साठा उपलब्ध होणार आहे. कॅंप सदर बझार येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशननंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली होतील.
प्रश्न – नवीन वर्षाचा आपला काय वैयक्तिक संकल्प आहे?
उत्तर – पालिकेच्या कारभारात रचनात्मक कामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नव्या कामांसाठी झोकून देऊन कामं करणे हा प्रशासकीय संकल्प आणि त्याची व्यापकता लक्षात घेता कामाला दिवसही कमी पडतो. तरीही स्वतःसाठी आखीव दिनचर्येत कुटुंबासाठी वेळ, चांगल्या पुस्तकांचे वाचन व नवीन रचनात्मक कामांचा शोध हा माझा वैयक्तिक संकल्प आहे .
प्रश्न – पालिकेत आपली कार्यपध्दती सातत्याने चर्चेत असते काय सांगाल?
उत्तर – प्रशासनात भिन्न प्रवृत्ती भेटतात व कामाची चौकटही ठरवावी लागते. प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्याविषयी कोण काय बोलतं याचा विचार न करता होणारी टीका मी सकारात्मकतेने घेतो. माझी मुख्याधिकारी पदावर नेमणूक कामासाठी आहे आणि माझे काम मी सातत्याने करत राहणार.