डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील सांगवी – डोर्लेवाडी गटातील झारगडवाडी, सोनगांव, मेखळी, निरावागज, गावातील कार्यकर्त्यांची बदली, नोकरी, ऍडमिशनची कामे होत नसल्याने हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) रामराम करण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार मिळत आहे.
अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या बारामती तालुक्यातील अनेक संस्थेवर काम करत असलेले प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक पक्षातील कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत. नातेवाईक पाहूनच कामे केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
या भागातील कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार, पार्थ पवार यांना आपल्या कामासंदर्भात भेटले आहेत. त्यांनी संबंधित संस्थेच्या प्रमुखांना काम मार्गी लावण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र अनेक वेळा भेटून देखील कामे होत नसल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
बारामती तालुक्यातील संस्थेचे काही प्रमुख पदाधिकारी स्वतःला ‘दादा’ समजू लागले आहेत. दादांनी काम करण्याचे आदेश देऊनही जाणीवपूर्वक व्यक्ती द्वेषापोटी निष्ठावंत कार्यकर्त्यांची कामे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे सांगवी – डोर्लेवाडी गटातील झारगडवाडी, सोनगांव, मेखळी, निरावागज, गावातील कार्यकर्ते नाराज होऊन पक्षाला रामराम करण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.