वन्यजीव तस्करीचा पश्चिम महाराष्ट्र “हॉटस्पॉट’- भाग -1

प्राणी रक्षणाचे आव्हान : कोकणातही पसरलेय तस्करांचे "जाळे'

पुणे  – मानवी तस्करी, शस्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी याबरोबरच वन्यप्राण्यांची तस्करी हीदेखील एक गंभीर समस्या बनली आहे. कमी काळात अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेक युवक या जाळ्यात ओढले जात आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वन्यजीव तस्करीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

 

वन्यजीव तस्करी हा सातत्याने घडणारा प्रकार असला, पण सध्या तस्करीचे वाढते प्रमाण, वन्यजीवांची अमानुष शिकार आणि तस्करीचे आधुनिक प्रकार यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वन्यजीव तस्करी गुन्हेगारी वाढत आहे. प्रामुख्याने खवले मांजर, मांडूळ, कासव आणि बिबट्याची सर्वाधिक तस्करी केली जात असल्याचे आतापर्यंत नोंदविलेल्या गुन्ह्यांमधून समोर आले आहे. याव्यतिरिक्त तितर, पोपट, विदेशी पक्ष्यांसह आणि चंदन, बांबू अशा वनस्पतींचीदेखील मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

 

विस्तृत पश्चिम घाट हा जैवविविधतेचा “हॉटस्पॉट’ मानला जातो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या प्राणी, पक्षी, उभयचर आणि वनस्पतींचा अधिवास आहे. त्यामुळेच या परिसरात मानवी वावर असल्याने तस्करीसाठी वाव मिळतो. तर सजावट, औषधनिर्मिती, आहार तसेच अंधश्रद्धेपोटी या वन्यजीव आणि वनस्पतींना स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून मोठी मागणी आहे. “इझी मनी’च्या हव्यासापोटी स्थानिक तरुण तस्करीच्या जाळ्यात ओढले जात आहेत, असे निरीक्षण वन्यजीव अभ्यासकांनी नोंदविले आहे.

 

गेल्या काही काळात समोर आलेले वन्यजीव तस्करीचे गुन्हे

महिना –  ठिकाण  – गुन्हा

ऑगस्ट  – सातारा  – जिवंत खवले मांजर जप्त

सप्टेंबर -रत्नागिरी जिवंत खवले मांज़र आणि मांडूळ जप्त

ऑक्टोबर- बुलढाणा ऑनलाइन माध्यमातून 1.7 किलो खवल्यांची विक्री

ऑक्टोबर- पेण-पनवेल 12 किलो खवले जप्त

ऑक्टोबर- मुंबई- काळवीट कातडी जप्त

ऑक्टोबर- ठाणे -बिबट कातडी जप्त

ऑक्टोबर- ठाणे -विविध 88 वन्यजीवांची तस्करी

नोव्हेंबर- पुणे -30 कासवांची तस्करी

नोव्हेंबर- पुणे- मांडूळ तस्करी

नोव्हेंबर -रत्नागिरी- खवले मांजराचे 10 किलो खवले जप्त

तस्करीची मुख्य कारणे

  • वन्यप्राण्यांची मुबलक उपलब्धता
  • वनांमध्ये सहजपणे संचाराची सूट
  • स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागणी
  • तस्करी आणि विक्रीसाठी उपलब्ध होणारे नवे मार्ग
  • कमी वेळात अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यास
  • स्थानिक नागरिकांमध्ये जागृतीचा अभाव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.