नागपूर : नागपुरातील नंदनवन परिसरात मानसिक तणावाखाली असलेल्या एका युवकाने सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पत्नी आणि मुलाचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. वाहनांना कुशन लावण्याचा व्यवसाय करणाऱ्या रवी नांदूरकर या व्यक्तीने प्रथम त्याची पत्नी पिंकी (३२) हिच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर शेजारी झोपलेल्या मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच शेजारी धावत आले आणि त्यांनी रवीला पकडले. यावेळी पिंकी रक्ताच्या थारोळ्यात आढळली, तर मुलाची दोन बोटे कापली गेली होती. रवीने स्वतःच्या गळ्यावरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांनाही तात्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून पिंकी यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रवीला गेल्या सहा महिन्यांपासून ‘कुटुंबाला संपवून टाक, तुला मोक्ष मिळेल’ असे आवाज येत होते. याच मानसिक तणावातून त्याने आठ दिवसांपूर्वी गांधीबागमधून चाकू खरेदी केला होता. रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवण करून झोपल्यानंतर पहाटे त्याने ही कृती केली. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.