पुणे – राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सुमारे सतरा लाखांहून अधिक कर्मचारी संपावर गेले होते. मात्र अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कर्मचारी मंडळाची एक बैठक पार पडली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर संपकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
या निर्णयानंतर पुण्यातील खेड येथे आंदोलन कर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यादरम्यान आता बायकोला पेंशन मिळणार असल्यामुळे नवऱ्याने आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला. हा निर्णय जाहीर होताच नवऱ्याने थेट आंदोलनस्थळी बायकोला उचलून घेत जल्लोष केला. नवऱ्याच्या या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर सर्व संपकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक14 मार्च, 2023 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक 28 मार्च, 2023 पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.