पुणे -पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करून अत्याचार केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. तर, कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण कांबळे (रा. उरुळी देवाची) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पत्नीने फिर्याद दिली आहे.
यानुसार पतीसह सासू, सासरे दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे हे कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. एप्रिल 2016 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. तेव्हापासून ते उरुळी येथे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, लग्न
झाल्यापासून सासरच्या व्यक्तींकडून फिर्यादी यांचा छळ सुरू होता. तर, सुनिल यांच्याकडून अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी सुनील कांबळे यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर आणि अन्य सहकारी करीत आहेत.