लुधियाना – लुधियानामध्ये गुन्हेगारांचे धाडस चांगलेच वाढले आहे. आता घडलेल्या खळबळजनक घटनेत गुन्हेगारांनी आम आदमी पक्षाचे नेते अनोख मित्तल आणि त्यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. यात मित्तल यांच्या पत्नी लिप्सी यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अनोख मित्तल हे हॉटेलमध्ये जेवण करून पत्नीसोबत घरी परतत होते. लुटारूंनी लुटण्याच्या उद्देशाने दोघांवरही हल्ला केला. या घटनेत आप नेत्याच्या पत्नी लिप्सी मित्तल यांचा मृत्यू झाला. दरोडेखोर सशस्त्र होते. या हल्ल्यात अनोख मित्तल गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुरका गावाजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. लुधियाना-मालेरकोटला रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतणाऱ्या जोडप्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. रविवारी संध्याकाळी संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात पोहोचून कारवाईची मागणी करण्यास सुरुवात केली.
अनोख मित्तल हे एक नेते असण्यासोबतच एक व्यावसायिक देखील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यानंतर पती-पत्नी कारमधून घरी परतत होते. गाडी थांबवल्यानंतर दरोडेखोरांनी दोघांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांचा हेतू दरोडा होता की इतर काही कट होता हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. स्थानिक लोकांचा रोष पोलिसांवरही भडकला. ते म्हणाले की, गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत.