पुणे- मुलांना जेवायला देताना किरकिर घालणाऱ्या पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार काशेवाडी येथील अशोकनगर कॉलनी येथे घडला. यातील पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.
आस्मा हवारी (35 रा. अशोकनगर, काशेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पती तौसिफ नुरहसन हवारी (37) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ हा केशकर्तनलाय दुकानात कामाला आहे. त्याची पत्नी आस्मा आणि एक मुलगी आणि दोन मुले आहेत. हे कुटुंब काशेवाडीत राहण्यास आहे. मुलगी तेरा वर्षांची असून एक मुलगा 10, तर लहान मुलगा सात वर्षांचा आहे. रविवारी रात्री मुलांना जेवण देताना पत्नी आस्मा किरकिर करते या कारणातून त्याने तिला मारहाण केली.
यावेळी तिच्या पोटावर देखील त्याने लाथा मारल्या. भांडणे निवळल्यानंतर सर्व रात्री झोपले. सोमवारी सकाळी तौसिफने पत्नी आस्मा हिला आवाज दिला असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ती निपचीत पडली होती. त्याने लागलीच शेजारच्यांना बोलवले. माहिती मिळताच काही वेळातच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात रात्रीच्या पती पत्नीच्या भांडणात तौसीफने मारहाण केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस करत आहे.