- मामुर्डी गावातील खळबळजनक घटना
देहूरोड – भल्या पहाटे उठून पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या गळ्यावर फावड्याचा घाव घालत निर्घृण खून केला. संशयावरून ताब्यात घेतलेल्या पत्नीने खुनाची कबुली दिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. देहूरोड परिसरातील मामुर्डी गावात मंगळवारी (दि. 29) पहाटे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पत्नीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक कलहातून घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मयूर गोविंद गायकवाड (वय 28, रा. मामुर्डी, देहूरोड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी मयूरच्या पत्नी रितू (वय 24) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी मयूर आणि रितू यांचा प्रेमविवाह झाला होता. घरी मयूरची आई, त्याचा लहान भाऊ आणि मयूर-रितू राहत असत.
सोमवारी (दि. 28) रात्री त्याची आई आणि भाऊ कामावर गेले होते. रात्री दोघांमध्ये वाद झाले होते, त्यानंतर दोघेही जेवण न करता झोपले. रितू पहाटे उठली आणि झोपेत असलेल्या मयूरवर तिने फावड्याने गळ्यावर, डोक्यावर घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयूरचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर तिने आरडाओरडा केला. स्वत: मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली असा बनावही रितूने रचला.
मात्र पोलिसांचा संशय बळावल्यानंतर तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने स्वत: फावड्याने खून केल्याची कबुली दिली.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर आणि गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस पथकाचे घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळाचा, मृतदेहाचा पंचनामा करीत मयूरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, नेहमी मोकळा असणारा दारातील कुत्रा खुनाच्या वेळी बांधलेला होता. पती, पत्नीमध्ये भांडण झाल्याने रात्री बनवलेले जेवण शिल्लक होते. त्यामुळे कौटुंबिक वादातून मयूरचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याशिवाय रितूने खून केल्याची कबुली दिली असली तरी पोलीस सखोल तपास करीत आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
तीन दिवसांतील खुनाची दुसरी घटना
अनैतिक प्रेमसंबंधातून शनिवारी (दि. 26) पहाटे तरुणीचा खून करून मृतदेह आदर्शनगर किवळे येथील खाणीत टाकण्यात आला. हे प्रकरण घडल्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे मंगळवारी पहाटे पुन्हा खुनाच्या घटनेने देहूरोड शहर परिसर हादरले आहे.