वाईत सीसीटीव्ही, स्पीकर यंत्रणा कार्यान्वित

कायदा सुव्यवस्थेसह वाहतूक कोंडीवर ठेवता येणार नियंत्रण

वाई  – शहरात विविध ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीकर सिस्टीम आज कार्यान्वित करण्यात आली. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अजित टिके यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

पोलीस खात्यातील मनुष्यबळाची मर्यादा व वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी व वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी तसेच गुन्हेगारी कारवायांवर वचक ठेवण्यासाठी वाई पोलिस ठाण्याच्यावतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. याकामी दोन महिन्यांपासून विविध सामाजिक संस्था, संघटना उद्योजक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या सहकार्याने शहरातील वर्दळीच्या 32 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली.

भीमनगर, बावधन नाका, न्यायालय परिसर, एसटी स्टॅंड, शिवाजी चौक, गणपती घाट, गोविंद रामेश्‍वर मंगल कार्यालय, शाहीर चौक, भाजी मंडई, किसन वीर चौक, धुंडी विनायक चौक, जामा मस्जिद, चावडी चौक, कॉलेज रोड, सायली कट्टा आदी ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले. तर किसन वीर चौक, भाजी मंडई गणपती घाट, एसटी स्टॅंड या वर्दळीच्या मुख्य ठिकाणी स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस ठाण्यातून अधिकारी-कर्मचारी यांना कायदा सुव्यवस्था व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येणार आहे. स्पीकर बसविल्यामुळे वाहतूक समस्या व तातडीच्या प्रसंगी सूचना देणे सोयीस्कर होणार आहे. याशिवाय गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेण्याच्या सूचनांमुळे गुन्हेगारी कारवायांवर प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.

लोकसहभाग मिळविण्यासाठी शहरातील पत्रकारांनीही मोलाची भूमिका बजावली. प्लॅनेट इलक्‍ट्रिकल्सचे अतुल जगताप यांनी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर अत्याधुनिक व उच्च दर्जाची यंत्रणा बसवून दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, नाईक प्रशांत शिंदे, कांताराम बोराडे यांनी लोकसहभाग मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वाई शहरात या यंत्रणेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे, त्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)