वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेणे आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना नामनिर्देशित करण्यामागील कारण अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज स्पष्ट केले. राष्ट्राला एक करणे आणि सत्तेची धुरा नवीन सरकारकडे सोपवण्यासाठीच आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीतील माघारीबाबतचा निर्णय घेतल्यानंतर बायडेन यांनी प्रथमच आपली मनोभूमिका उघडपणे स्पष्ट केली आहे.
मी नवीन सरकारकडे मशाल सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळाचे सार्वजनिक जीवन थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच नवीन, ताज्या दमाच्या, युवा आवाजाला जागा देण्याचीही ही योग्य वेळ आहे, असे बायडेन म्हणाले. मात्र यावेळी ते भावुक झाले होते. अध्यक्षांचे कार्यालय जरी आपण सोडणार असलो, तरी देशवासियांचे प्रेम आपल्याला अधिक मिळाले आहे.
अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली हा आपला बहुमान आहे. मात्र आता लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रमुख गरज आहे. कोणत्याही वेळी ही गरज सर्वात जास्त महत्वाची आहे. लोकशाहीच्या बचावाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ शकत नाही. वैयक्तिक महत्वाकांक्षाही यात आडवी येऊ शकत नाही, म्हणूनच आपण सरकारची धुरा नवीन सरकारकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, असे बायडेन म्हणाले.
कमला हॅरिस यांचे कौतुक
कमला हॅरिस अनुभवी, सक्षम आहे आणि आपल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात एकत्र असताना त्या अविश्वसनीय जोडीदार होत्या, अशा शब्दात बायडेन यांनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले. बायडेन प्रशासनाच्या आर्थिक आणि परराष्ट्र विषयक धोरणांची जबाबदारी हॅरिस यांनीच सांभाळली असल्याचे बोलले जाते आहे. भारतीय आणि आफ्रिकन वंशाच्या ५९ वर्षीय कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार आहेत. ऑगस्ट महिन्यात शिकागोमध्ये होणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनामध्ये हॅरिस यांच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.