“एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?”; प्रियांका गांधी यांचा सरकारला सवाल

नवी दिल्ली :   देशात करोनाला रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी करोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. करोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का? असा थेट प्रश्न प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे.

“केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचेही लसीकरण पूर्ण करू शकलेले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीने आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली” असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे.

तसेच “केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत जवळपास 34 कोटी लसींचीच मागणी केली होती. लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता प्रत्येक दिवशी जवळपास 19 लाख नागरिकांचे  लसीकरण पार पडत आहे.” “सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारने देशासमोर ठेवलेली नाही.

करोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?” असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला आहे. तसेच “लसीच्या वितरणासंबंधी केंद्र सरकार दिशाहीन आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन नीतीमुळे अनेक राज्यांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावं लागलं.”

“आज मॉडर्ना, फायजर यांसारख्या लस कंपन्यांनी राज्यांशी थेट व्यवहार करण्यास नकार देत केंद्राशी चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. ग्लोबल टेंडर काढायला लावून राज्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनण्याची वेळच का आली?” असे अनेक प्रश्न प्रियंका यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.