उपस्थितीच्या प्रक्रियेमुळे संसर्ग पसरण्याचा धोका
करोना स्थितीबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण
पुणे – लक्षणे नसणाऱ्या, पण करोना पॉझिटिव्ह बाधितांसाठी प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय दिला आहे. मात्र, यासाठी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती लावून, सहमतीपत्र भरून द्यावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
लक्षणे नसलेल्या बाधितांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. त्यामुळे त्यांना होम आयसोलेशनचा पर्याय दिला जातो. मात्र, या व्यक्तींना खासगी डॉक्टरांकडून पुढील उपचार करायचे असतील, तर रुग्णांना सर्वप्रथम डॉ. नायडू किंवा जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये पाठवतात. तेथे रुग्णाची नोंद होते. त्यानंतरच खासगी डॉक्टर उपचार सुरू करतात.
परंतु, या दरम्यान संबंधित रुग्ण घराबाहेर पडतो. प्रवास करतो. कोविड केअर सेंटरमधील प्रक्रिया आणि पुन्हा परतीचा प्रवास. या कालावधीत त्या व्यक्तीच्या संपर्कात आपसूकच इतर नागरिक येतात. त्यातूनच संसर्गाचा धोका वाढत असल्याचे दिसून येते. त्यातच होम क्वारंटाइन व्यक्तीच्या हातावर शिक्के मारणे, त्याबाबतची माहिती देणे या गोष्टी आता होत नसल्याने समाजात होम आयसोलेशन व्यक्तींबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळेच रुग्णांकडून सहमती पत्रक घेण्यासाठी त्याची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक ठेवण्याऐवजी ऑनलाइन अथवा नातेवाईकांच्या जबाबदारीवर परवानगी दिल्यास त्यामुळे मोठा फायदा होईल, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.