‘उर्वरित 38 जागा तरी कशाला सोडता’

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शिवरकर यांची उपरोधिक टीका

हडपसर – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील किमान 250 जागा जिंकेल, असे वक्‍तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. 288 पैकी 250 जागा सेना-भाजप युती जिंकणार आहे. असा पालकमंत्र्याना दांडगा विश्‍वास आहे. तर मग उर्वरित 38 जागा तरी कशाला सोडता. त्याही जागांवर जोर लावून त्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी उपरोधिक सूचना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पिंपरी येथे एका कार्यक्रमात केलेल्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवरकर यांनी ही टीका केली.

शिवरकर पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील यशाने हुरळून गेलेल्या भाजप नेत्यांनी विधानसभेच्या अडीचशे जागा जिंकण्याची केलेली वल्गना मोठी हास्यास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजप-सेना युतीच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराचा अनुभव राज्यातील जनतेने घेतला आहे. जनतेच्या पदरी त्यातून साफ निराशा आली आहे. कोणत्याही क्षेत्रातील कोणताही प्रश्‍न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे.कॉंग्रेस आघाडीच्या काळात हे राज्य देशात अनेक बाबतीत सरस होते. मात्र, राज्याचे हे पुढारलेपण युती सरकारच्या काळात पूर्णपणे लयाला गेले आहे. नोकऱ्या मागत येणारा सुशिक्षित युवक, हताश मध्यमवर्ग, आत्महत्या करणारा शेतकरी, नोकरी गेल्यामुळे नैराश्‍यग्रस्त झालेले कामगार आणि उद्योगधंदे बंद पडत चालल्याने निराश झालेला उद्योजक आणि व्यापारी हे आजच्या महाराष्ट्राचे चित्र आहे. अशी स्थिती राज्याची असताना 250 जागा जिंकण्याचा गमजा मारणाऱ्या मंत्र्यांना आता जनताच निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देईल, असेही शिवरकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.