पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. ही निवडणूक मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून असल्याने मतमोजणीसाठी उशीर होतो. तसेच दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारांची संख्या आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी यामुळे वैध-अवैध मतपत्रिकेची विभागणी करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा निश्चित होण्यास वेळ लागला. त्यामुळे अधिकृत निकाल हाती येण्यास शुक्रवार उजाडणार आहे.
…म्हणून निकाल उशिराने
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही मतपत्रिकेवर होते. यामध्ये मतदाराला पसंतीक्रम लिहावा लागतो. मतदार संघासाठी निश्चित केलेल्या मतांचा कोटा एखाद्या उमेदवाराने पूर्ण केला, तर तो विजयी घोषित केला जातो. जर हा कोटा पूर्ण झाला नाही, तर जो शेवटच्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे. त्या उमेदवाराची दोन नंबरची मते कोणाला मिळाली, ती इतर उमेदवारांच्या पारड्यात टाकली जातात. त्यातूनही विजयासाठीचा कोटा पूर्ण झाला नाही, तर पुन्हा शेवटून दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारीची दोन नंबरची मते विचारात घेतली जातात. जो पर्यंत मतांचा कोटा पूर्ण होत नाही, तो पर्यंत अशी प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास विलंब होतो.
शिक्षक व पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की भाजप बाजी मारतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असल्याचे चित्र होते.
पुणे विभागात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यांतून पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 50 मतदान झाले आहे. यात 62 उमेदवार रिंगणात होते. शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर वैध आणि अवैध मतपत्रिकांची विभागणी सुरू करण्यात आली. सायंकाळी आठ वाजेपर्यंत 1 लाख 23 हजार मतांच्या विभागाणीचे काम पूर्ण झाले होते.