कोलकता – नारद स्टिंग ऑपरेशन करणारे वरिष्ठ पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी सीबीआयकडून झालेल्या अटकसत्राबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांना का अटक करण्यात आली नाही, असा कळीचा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संबंधित स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने पश्चिम बंगालमध्ये कारवाई केली. त्यानुसार, त्या राज्यातील दोन मंत्र्यांसह तृणमूल कॉंग्रेसच्या चार नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांना नंतर विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला.
अटकेच्या कारवाईबाबत सॅम्युअल यांनी प्रतिक्रिया दिली. भ्रष्टाचारविरोधात पाऊले उचलण्याची गरज आहे. मात्र, तपास न्याय्य असावा, असे म्हणत त्यांनी अधिकारी यांना अटक न झाल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले.
सॅम्युअल यांच्या नारद न्युज या वेब पोर्टलने 2014 मध्ये एक स्टिंग ऑपरेशन केले. त्या पोर्टलच्या पत्रकारांनी एका कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत तृणमूलचे काही मंत्री, खासदार आणि आमदारांची भेट घेतली. संबंधित कंपनीवर मेहेरनजर करावी या हेतूने काही नेत्यांना पैसे देण्यात आले.
स्टिंग ऑपरेशनमधील व्हिडीओ रेकॉर्डिंगवरून काही नेते पैसे स्वीकारत असल्याचे दिसून आले. ते स्टिंग ऑपरेशन बंगालमध्ये 2016 या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीआधी प्रसारित करण्यात आले. त्या प्रकरणाचा तपास पुढील वर्षी कलकत्ता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला.
स्टिंग ऑपरेशन प्रकरणात तृणमूलचे तत्कालीन मंत्री अधिकारी हेही आरोपी आहेत. अधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. नंदीग्राम मतदारसंघातून त्यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. आता भाजपने अधिकारी यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.