नोएडा –पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशची संस्कृती आणि जनतेच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा अपमान केला. तरीही त्यांचा पाठिंबा कशासाठी घेतला जातोय, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना उद्देशून केला.
ममता उत्तर प्रदेशात सपचा प्रचार करणार आहेत. त्यावरून भाजपच्या एका प्रचार कार्यक्रमात बोलताना स्मृती यांनी अखिलेश यांच्यावर टीकास्त्र सोडले. अखिलेश यांना स्वत:च्या जोरावर जनतेचा पाठिंबा मिळत नसावा. त्यामुळेच ते इतरांचा पाठिंबा घेत आहेत, अशी खिल्ली स्मृती यांनी उडवली.
संस्कार, संस्कृतीची परिभाषा बनवणारी भूमी म्हणून उत्तर प्रदेशची ओळख आहे. आता ती भूमी विकासाची नवी व्याख्या तयार करत आहे, असे त्या म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पराभूत करण्याची किमया केली.