पवार यांचा अनुभव समजण्यासाठी साडेपाच वर्षे का लागावीत? – शिवसेना

मोदींच्या ऑफरवरून भाजपवर निशाणा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित कार्य करण्याविषयी दिलेली ऑफर नाकारल्याचा गौप्यस्फोट अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्या ऑफरवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पवार यांचा अनुभव समजण्यासाठी साडेपाच वर्षे का लागावीत, असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात नाट्यमय स्वरूपाच्या राजकीय उलथापालथींनंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेवर आले. सरकार स्थापनेचा सस्पेन्स कायम असताना मोदींनी ऑफर दिल्याचे पवार यांनी नमूद केले. पवार यांच्या अनुभवाचा फायदा देशाला होईल, अशी भावना मोदींनी त्यावेळी व्यक्त केली.

त्याचा संदर्भ घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजप, मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शाब्दिक बाण सोडण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आल्यावर पवार यांच्या अनुभवाचा साक्षात्कार झाला हे नवल! पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल शहा निवडणूक प्रचारात करायचे.

नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी असल्याची दुषणे प्रचारावेळी दिली गेली. मग, कोणत्या अनुभवाचा फायदा मोदींना अपेक्षित होता, असा प्रश्‍न अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राजकारण उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावर पोहचले आहे. त्या प्रवासात भाजपचे जे हसे झाले; त्याच्या रंजक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे झालेले नाट्य पवार यांनी समोर आणले. पवार झुकले नाहीत. कॉंग्रेसने शहाणपण दाखवले. शिवसेनाही दबावतंत्राची पर्वा न करता भूमिकेवर ठाम राहिली, असेही त्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.