छत्रपती संभाजीनगर – 2003-2004 चा विषय असेल. तेव्हा पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा मोर्चा मुंबईत आला होता. तिथे व्यासपीठावर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि इतर काही नेते होते. सगळ्यांनी एकमुखाने सांगितले होते की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे.
मग अडवले कोणी पुढे? तुमच्या सगळ्यांचे एकमत असेल तर गेल्या 15-20 वर्षांपासून हे होत का नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शब्द का टाकला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील बहुतांश भागात अशांतताही पसरली. याच आरक्षणावरून काही राजकीय नेतेमंडळी, पक्ष आपली राजकीय पोळी भाजत आहे. याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले, मोदींनी बारामतीत सांगितले होते की मी शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात आलो. मग त्याच शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मोदींकडे शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे आधीची पाच वर्ष भाजपबरोबर केंद्रात, राज्यात नांदत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी शब्द का नाही टाकला? जरांगे पाटलांच्या पाठीमागून यांचे राजकारण मते मिळवण्यासाठी चालू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ, माझ्या नादी लागू नका. माझी पोरं काय करतील हे यांना कळणारही नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ, पोट आणि गालपण बघावे लागतील, असा इशाराच राज ठाकरेंकडून देण्यात आला.