आता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’? पी. चिदंबरम यांचा सवाल

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून  भारतावर गंभीर आरोप केला होता. यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पी. चिदंबरम यांनी म्हंटले कि, डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाबळी लपविणाऱ्या देशांमध्ये त्यांनी चीन आणि रशियाच्या पंक्तीत भारताला बसविले आहे. त्याचप्रमाणे जगभरात प्रदूषण पसरविणाऱ्या देशातही त्यांनी चीन आणि रशियाच्या जोडीने भारताचा समावेश केला. आता म्हणणार का नमस्ते ट्रम्प? आता करणार का प्रिय मित्राच्या स्वागतासाठी मेळाव्याचे आयोजन? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काल प्रत्यक्ष समोरासमोर पहिली चर्चा झाली. यावेळी लाखो लोकांच्या मृत्यूवर आपल्या धोरणांचा बचाव करत ट्रम्प म्हणाले की, जर वेळेवर लॉकडाऊन लावला नसता तर यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. जर आपण आपला देश सुरूच ठेवला असता तर दोन लाख नाही तर अधिक लोकांचा जीव गेला असता. जेव्हा तुम्ही आकड्यांची गोष्ट करता त्यावेळी चीनमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला हे तुम्हाला माहित आहे का? रशिया आणि भारतात किती जणांचा मृत्यू झाला? हे योग्य आकडे देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा 71 लाखांच्या पुढे गेला असून, मृतांचा आकडा देखील 2 लाखांवर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.