मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची?’ असे विधान आमदार छगन भुजबळांनी केले होते. त्या विधानावर आता भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. यावर आता स्वतः भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले,’मी आपल्या वक्तव्यावर ठाम आहे, मी देशविरोधी वक्तव्य केलेलं नाही, असं यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले,’मी कुठलेही चुकीचे विधान केलेले नाही. सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना शाळेतल्या पहिल्या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजा करतो. पण आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची पूजा आपण का करत नाही? ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी केली, प्रत्यक्ष शिकवलं, आपल्याला शिकवण्यासाठी ज्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला, शेणाचा मार खाल्ला, अशांची पूजा आपण केली पाहिजे असे मी बोललो होतो मात्र माझ्या विधानांचे चुकीचे विडिओ शेअर करत भाजप नेत्यांनी वाद निर्माण केला आहे.
ते पुढे म्हणाले,’कुणाचे फोटो काढा किंवा काढू नका, हा माझा मुद्दा नव्हता. आम्हीही हिंदू आहोत. मी ही देवीच्या दर्शनाला जातो. तुम्ही तुमच्या आयुष्यात, घरात कुठल्या देवाची पुजा करा हा तुमचा प्रश्न. फुले, शाहू आंबेडकरांनी सांगितलं की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका.शाहू, फुले, आंबेडकरांना बाजूला ठेवून आपण जे करतो आहोत, ते योग्य नाही, एवढचं माझं म्हणणंय असं म्हणत त्यांनी या वादावर आपली भूमिका मांडली आहे.