कार्यालयात बोलवू नका; शिक्षक क्रांती संघटनेचा आग्रह
पुणे – करोना काळात शिक्षण विभागातील प्रशासकीय कामांसाठी ऑनलाइन पद्धतीचा प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना विनाकारण सतत कार्यालयात बोलावून त्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये, असा आग्रह शिक्षक क्रांती संघटनेने शिक्षकांबाबत वेतन विभागाकडे धरला आहे. माहिती ऑनलाईन पद्धतीने संकलित करून प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
शासनाने शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शालार्थ प्रणाली विकसित केली. या प्रणालीवर शाळा वेतनाबाबत परिपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने भरून वेतन पथक कार्यालयास पाठवितात. वेतन पथकाच्या कार्यालयात सर्व शाळांची वेतन शाळांना पारित करण्यात येते. पण, करोना प्रादुर्भाव असतानाही अधिकारी वेतनाबाबत शालार्थ प्रणालीवर भरलेल्या माहितीच्या दोन हार्ड कॉपीचे प्रस्ताव प्रत्यक्ष कार्यालयात जमा करण्यास सांगत आहेत. त्याबरोबरच त्यांना आवश्यक असणारी शाळांची माहिती ऑनलाइन न मागता प्रत्यक्ष जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शाळांना व शिक्षकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता वेतन थांबविण्यात येत असते. त्यामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागते. यामुळे शिक्षक, कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. कार्यालयातील गर्दीमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिक्षण विभागातील भ्रष्ट व मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शिरसाट यांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप आदींना पाठविले आहे. यावर आता तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील शाळांना सन 2010 पासूनच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व इतर आवश्यक माहितीची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेतन बिलानिमित्त तरी माहिती जमा होण्यास वाव आहे. या सर्व फायली आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत. माहिती सादर करताना सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. मात्र शिक्षक, कर्मचारी एकाच वेळी सर्वांची कार्यालयात गर्दी होत आहे.
– राजेंद्र साठे, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक