आमदारांपासून लपविले जाते माहिती
पुणे – येत्या आर्थिक वर्षाच्या (2020-21) रेडी रेकनर अर्थात जमिनींच्या वार्षिक बाजारमूल्य दर निश्चितीसाठी जिल्हा प्रशासन आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शहर व जिल्ह्यातील आमदारांची बैठक बोलविली. मात्र, गोपनीयतेच्या नावाखाली आमदारांना त्यांची माहितीच देण्यात आली नाही. त्यामुळे कशावर चर्चा करावयाची, काय सूचना द्याव्याचा, अशा प्रश्न आमदारांपुढे उभा राहिला आहे. माहितीच द्यावयाची नाही, तर बैठकीला बोलविलेच कशाला, असा संतप्त सवाल आमदारांनी केला. रेडी रेकनरच्या दराबाबत एवढी गोपनीयता प्रशासनाकडून का पाळण्यात येते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात रेडी-रेकनरमधील जमिनीचे दर नव्याने निश्चित केले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार हे दर निश्चित करण्यापूर्वी शहर व जिल्ह्यातील आमदारांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित घेणे बंधनकारक आहे. तशी बैठक दरवर्षी घेतली जाते. त्यामध्ये प्रस्तावित दरवाढीवर आमदारांच्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ते बदल करून हे दर निश्चित केले जातात. परंतु आजपर्यंत या बैठकीला बहुतांश आमदार अनुपस्थितीतच राहतात. 2020-21 या आर्थिक वर्षातील रेडी रेकनरचे दर निश्चित करण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीस फक्त आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी देखील दुपारी बारापर्यंत बैठकीला आले नाहीत. त्यामुळे आमदार मिसाळ यांनी अधिकाऱ्यांकडे वाट पाहून प्रस्तावित दरवाढीच्या संदर्भातील माहिती मागितली. परंतु ती माहिती देण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे देऊ शकत नाही, असे उत्तर नोंदणी निरीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे माहितीच मिळणार नसेल, तर बैठकीला बोलविले कशाला, असा संतप्त सवाल करून मिसाळ या बैठकीतून बाहेर पडल्या. त्यामुळे या बैठकीत चर्चा होण्याऐवजी ती केवळ कागदोपत्रीच ठरली.
रेडी-रेकनरसंदर्भात आमदारांची बैठक बोलवली होती. बैठकीला जिल्हाधिकारीदेखील उपस्थित नव्हते. अकराची बैठक बारापर्यंत सुरू झाली नाही. गोपनीय असल्यामुळे कोणत्याही स्वरूपात ही माहिती देता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत, असे कारण मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी उपस्थित राहणार नव्हते आणि माहितीच द्यायची नव्हती, तर बैठकच कशाला बोलवली?
– माधुरी मिसाळ, आमदार, पर्वती