प्लॅस्टरच्या मूर्ती का नकोत?

आपल्याकडे साधारणपणे राखीपौर्णिेनंतर वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. सार्वजनिक गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा विचार मांडण्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली. मात्र, गेल्या काही वर्षांध्ये या उत्सवाला व्यापारी स्वरूप प्राप्त झाले. आखीव-रेखीव मूर्ती बसवण्याच्या हट्टापायी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, आरास करण्यासाठी प्लॅस्टिकचा अतिवापर केला जाऊ लागला. मधल्या काळात पर्यावरणाची होणारी अतोनात हानी, त्यातून बिघडलेले ऋतुचक्र, हवामान बदल यांविषयी बऱ्याच प्रमाणात चर्चा झाल्या, जनजागृती झाली. आम्हीही गेल्या काही वर्षांपासून याबाबत प्रबोधन आणि जनजागृती करत आहोत.

अलीकडील काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना काही प्रमाणात साथ मिळत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय पर्यावरणाचा विचार करून
गणेशोत्सव साजरा करताना सर्वप्रथम बदल करावा लागेल तो उत्सवमूर्तीमध्ये. वस्तुतः, पूर्वीच्या
काळी गणेशाची मूर्ती ही मृत्तिकेपासून म्हणजे शाडूच्या मातीपासून बनवली जात असे. आता शाडू मातीची उपलब्धता कमी झाली आहे. तसेच त्यापासून केल्या जाणाऱ्या मूर्तींची किंमतही तुलनेने अधिक असते. तसेच या मूर्ती वजनाने जड असतात. या तिन्ही मर्यादा लक्षात आल्यामुळे प्लॅस्टर ऑफ
पॅरिसच्या मूर्तीचा पर्याय पुढे आला आणि पाहता पाहता तो कमालीचा लोकप्रियही झाला. प्लॅस्टर ऑफ
पॅरिस म्हणजे कॅल्शियम सल्फेट.

शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे काम कष्टदायी आहे. त्यातुलनेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती
बनवणे काहीसे सुलभ आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस कृत्रिमरित्या तयार करण्यात येत असल्यामुळे त्याची
उपलब्धता मुबलक आहे. तसेच या मूर्ती साच्यामध्ये तयार करण्यात येत असल्याने कष्ट कमी आहेत. तसेच त्या वजनाने हलक्‍या असल्यामुळे त्यांची ने-आण करणे, त्या घरी बसवणे या गोष्टीही सुलभ आहेत.

परिणामी, प्लॅस्टरच्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढत गेले, पण कालांतराने असे लक्षात आले की त्या मूर्ती विसर्जित झाल्यावर पाणी दूषित होते. त्यामुळे त्याला पर्याय काय हा विचार पुढे आला. त्यातूनच मग कागदाच्या लगद्यापासून मूर्ती तयार केल्या जाऊ लागल्या. काही ठिकाणी आजही कारागीर शाडूच्या मूर्ती तयार करतात. मात्र, अनेकदा त्यांना विक्रीची भ्रांत असते. हे लक्षात घेऊन आम्ही “निसर्गमित्र’ या संस्थेतर्फे या मूर्तींच्या विक्रीची जबाबदारी घेऊन त्यांना आश्‍वस्त केले. लोकांचे प्रबोधन करून त्या मूर्तींची विक्री करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर अशा पद्धतीने शाडूच्या मूर्ती पुन्हा एकदा विराजमान होण्याचे प्रमाण वाढले आहे.

– प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.