…म्हणून मीसा झाली नाही लालूंची उत्तराधिकारी

पाटणा – बिहारमध्ये 1995 ते 2005 अशी तब्बल पंधरा वर्षे लालू प्रसाद यादव यांची राजवट होती. त्यांच्यावर खटले दाखल झाले, तुरूंगवारी करावी लागली तरी पक्षावरची आणि सत्तेवरची पकड त्यांनी घट्ट ठेवली होती. त्यांच्या गैरहजेरीत त्यांची पत्नी राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. त्यावेळी लालूंचे दोन्ही पुत्र तेजप्रताप आणि तेजस्वी हे दोघेही वय वर्षे दहाच्या आत होते. मीसा भारती ही त्यांची थोरली कन्या त्यावेळी अचानक प्रकाशझोतात आली. राबडी तिचा सल्ला घेत असत अशा चर्चाही होत्या. त्यामुळे मीसाच पित्याची खुर्चि सांभाळणार असे वाटत असताना मीसा आता पक्षाच्या केवळ स्टार प्रचारकच राहील्या आहेत.

मीसा नाही म्हणायला 2016 पासून राज्यसभेवर आहेत. त्या अगोदर 2014 मध्ये त्यांना पाटलीपुत्र येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचे काका आणि बंडखोर उमेदवार रामकृपाल यादव यांनी त्यांना 40 हजारांच्या मताधिक्‍क्‍याने पराभूत केले. मोदी लाटेत लालूंचा बिहार गड पूरता उध्वस्त झाला. त्यात मीसाही निवडणुकीत पडल्या.

मात्र नंतरच्या काळात त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. पण ही केवळ तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्या राजकारणात येण्यापूर्वीची सोय होती, असे आता सिध्द झाले आहे. त्याला कारण बिहारची मागची विधानसभा आणि आताचीही विधानसभा निवडणूक लालूंच्या दोन्ही मुलांभोवतीच फिरती राहीली आहे.

तेजप्रताप यांना लालूंचा कान्हा म्हटले जाते. आपल्या वेगवेगळ्या स्टंटमुळे ते चर्चेतही असतात. खुद्द लालूही भाषणापासून वर्तणुकीपर्यंत वेगवेगळे चमत्कार जाहीरपणे करायचे. त्यांची वेगळी केशभुषाही माध्यमांच्या चर्चेचा विषय. मात्र जे त्यांना जमले ते तेजप्रताप यांना जमले नाही. किंबहुना ते चेष्टेचाच विषय ठरले.

त्यातही मध्यंतरी त्यांनी थेट आपल्या भावावरच अर्थात तेजस्वीवरच आरोप केले. त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. नेमकी हीच संधी तेजस्वी यांना मिळाली व आज ते पक्षात आणि बिहारच्या मतदारांच्याही नजरेत लालूंचे वारसदार म्हणून प्रस्थापित झाले आहेत.

एकेकाळी मीस भारती या वैद्यकीय पदवीधर कन्येचा बोलबाला होता. त्यांची वक्तृत्वशैलीही प्रभावशाली असल्याचे पक्षाचे नेते मान्य करतात. त्या चांगली टक्कर देऊ शकतात असेही मानले जात होते. मात्र तरीही आज त्या केवळ स्टार प्रचारक या मर्यादीत भूमिकेत असून आपल्या धाकट्या भावाचा प्रचार करताना दिसतात.

मीसा यांना त्यांचे स्थान का दिले गेले नाही, असा सवाल बिहारच्या राजकारणात येतोच. तेव्हा लालू यांना मीसा यांच्या व्यतिरिक्त अन्य पाच मुली आहेत. मीसा यांना काही दिले तर त्याही दावेदार झाल्या असतात. त्यामुळे योग्यता असूनही मीसा यांना राज्यसभेशिवाय अन्य काही दिले गेले नाही.

मीसा डॉक्‍टर असल्या तरी त्यांनी कधी या पेशाला वेळच दिला नाही. याचा अर्थ त्यांची पाउले राजकारणाकडेच पडली होती. पण त्यातही कदाचित कन्या म्हणून त्यांच्या पदरात माप टाकणे टाळले गेले असेच म्हणावे लागेल.

अन्यथा पात्रतेबाबत शंका असताना जर तेजप्रताप राज्याचे आरोग्यमंत्री होउ शकतात, आणि लहान वयात तेजस्वी थेट उपमुख्यमंत्री होउ शकतात तर मीसा यांना डावलण्याचे कोणते कारणच नव्हते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.