कॉंग्रेस अन्‌ पृथ्वीराज बाबांची आत्ताच गरज का लागतेय?

– आ. जयकुमार गोरेंचा राष्ट्रवादीला सवाल
-कॉंग्रेस सोडणार नसल्याचा पुनरुच्चार

खटाव –
पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद नाही, असे पालुपद लावणाऱ्या राष्ट्रवादीला आत्ता लोकसभा निवडणुकीत त्यांची गरज का लागतेय? असा प्रश्‍न आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. सातारा, माढा, कोल्हापूर, बारामती आणि पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस आणि बाबांचे सहकार्य घेतल्याशिवाय यश मिळत नाही हे उमगल्यानेच राष्ट्रवादीला उपरती झाल्याचेही त्यांनी सांगितले. माढ्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच मीही जो निर्णय घेतलाय तो राष्ट्रवादीच्या कृतघ्नपणामुळेच घेतला असल्याचा तसेच मी कॉंग्रेसमध्येच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी धर्माच्या नावाखाली कॉंग्रेसचा वापर करुन घ्यायचा आणि नंतर प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसलाच खिंडीत पकडून त्रास देण्याचा उद्योग राष्ट्रवादीकडून केला जातो. बाबांची आणि कॉंग्रेसची पश्‍चिम महाराष्ट्रात ताकद नाहीच असे वारंवार सांगणाऱ्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मात्र त्याच बाबांना आघाडीसाठी आणि सहकाऱ्यासाठी साकडे घालावे लागते. कॉंग्रेसची ही ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच निर्माण झाली आहे.
बारामतीत हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे सहकारी, कोल्हापूरात बंटी पाटील आणि सहकाऱ्यांची ताकद लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या नावाखाली वापरुन घ्यायची आणि नंतर इतर निवडणुकात खरे रुप दाखवत मदत करणाऱ्यांनाच त्रास द्यायचा उद्योग राष्ट्रवादीकडून केला जातो. मला तर गेल्या दहा वर्षात पावलोपावली हाच अनुभव आला आहे.

दहा वर्षात दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीला साथ दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत फलटण तालुक्‍यातून युतीच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळाले होते.
मोदी लाट असूनही आम्ही माणमधून राष्ट्रवादीला निर्णायक मताधिक्‍य दिले होते. मात्र बदल्यात राष्ट्रवादीकडून मला आणि कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आला. माझे कुटुंब उद्‌ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस घालण्यात आल्या. आता मात्र कार्यकर्ते बदला घेण्याची वाट पहात आहेत. वीस हजार कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या बरोबर जाण्याची आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.