मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केली. यानंतर आता राज्यातील काँग्रेस आक्रमक झाले आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेस गुरुवारी (ता. 19 सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी राज्य सरकारवरदेखील निशाणा साधला. तसेच, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याविरोधात अशी विधाने होत असताना सरकार गप्प का आहे? असा सवाल त्यांनी केला.
नाना पटोले म्हणाले, देशाच्या संविधानाचा सैनिक म्हणून राहुल गांधी जी लढाई करत आहेत, म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. एका नेत्याने तर ज्याप्रमाणे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या झाली, त्याचप्रमाणे राहुल गांधींची हत्या करू, अशा पद्धतीची विधाने खुलेआम केली जात आहे.
पंतप्रधान मोदी हे देशाच्या संविधानाबद्दल बोलतात मग लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याविरोधात अशी विधानाने होताना ते गप्प का? अशा वाचाळवीरांविरोधात कारवाई का करण्यात आली नाही?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्य तसेच केंद्र सरकारने तातडीने या वाचाळवीरांवर कारवाई करावी. राहुल गांधींच्या केसाला धक्का लावण्याचा या लोकांनी स्वप्नातही विचार करू नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भाजपला सत्तेचा माज
भाजपचा खासदार डॉ. अनिल बोंडेंला लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल कोणती भाषा वापरावी? याची अक्कल नसावी. बुलढाण्यातील शिंदेंचे आमदार संजय गायकवाड म्हणजे अक्कल नसलेला गुंड प्रवृत्तीचा माणूस. त्याला आमदार म्हणावे का? असाही प्रश्न पडतो. पण राज्यसभेचे खासदार असलेल्या अनिल बोंडेंसारख्या सुशिक्षित माणसाने राहुल गांधींविषयी बोलताना तमा बाळगू नये. म्हणजे भाजपच्या नेत्यांमध्ये मस्तवालपणा ठासून भरला आहे हे स्पष्ट होते, अशी टीका पटोले यांनी केली.