शिवभोजन थाळी फक्‍त शहरातच का?

ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचा सवाल

भिगवण -महाराष्ट्रात सध्या शिवभोजन थाळीच्या बातम्या, चर्चा आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी मोठ्या शहरांत शिवभोजन थाळीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात कष्टकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने शिवथाळी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे 10 रुपयांत जेवण सुरू केले आहे. मात्र ही थाळी केवळ शहरातील लोकांसाठीच आहे का, असा सवाल ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतमजूर उपस्थित करीत आहेत. ग्रामीण भागात सुद्धा कष्टकरी आणि गरीब लोक राहतात.

शासनाने शहरी व ग्रामीण असा भेद करू नये, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. गावाकडील लोकांना मात्र हे भोजन दुरूनच साजरे करावे लागत असल्याची खंत चर्चेतून उमटत आहे. सामाजिक कार्यकर्ते सतीश काळे म्हणाले की, प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागातही शिवभोजन योजनेची सुरुवात करावी. भिगवणसारख्या निमशहरी गावात विविध खरेदी विक्रीसाठी शेतकरी, शेतमजूर आणि मच्छिमार येत असतात.

त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांची भोजनाची सोय होणार आहे. यामुळेच पारांवर आणि चौका-चौकात याबाबत चर्चा होताना दिसत आहेत. शासनाने ग्रामिण कष्टकरी व वंचितांचा विचार करायला हवा ही माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मच्छिमार व्यावसायिक बापू नगरे म्हणाले की, मच्छिमार पहाटे मासेमारीसाठी घर सोडतात. मासेमारी करून भिगवणच्या मच्छिमार्केटमध्ये मासे विक्रीसाठी येतात. त्यांच्या भोजनाची उपलब्धता महत्त्वाची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.