मुंबई – 2020 या वर्षात मनोरंजन क्षेत्राला मोठे धक्के पचवावे लागत आहे. 14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या घरी आत्महत्या केली. हा धक्का अजून विसरत नाहीत त्यातच आज सुप्रसिद्ध कोरिओग्राफर ‘सरोज खान’ यांचं निधन झालं.
सरोज खान यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झालं. गेल्या 20 जूनपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज पहाटे (3 जुलै) दोन वाजता त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, 14 जून रोजी सुशांतच्या जाण्याने सरोज खान यांना दुःख झाले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
सरोज खान म्हणाल्या होत्या की, “मी कधी सुशांतबरोबर काम केले नव्हते, पण मी त्याला अनेकदा भेटले होते. मला धक्का बसला आहे की तु हे पाऊल का उचलले? मला कल्पना नाही करता येत आहे की यामुळे त्याचे वडील आणि बहिणींवर काय परिणाम होईल, सुशांत तू कोणत्याही मोठ्या व्यक्तीशी बोलायला हवं होते, ज्यांनी तुझी मदत केली असती आणि तुला पाहून आम्हाला आनंद झाला असता. मला तुझे सर्व चित्रपट आवडायचे आणि तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहीन”. अश्या भावना सरोज खान यांनी इन्स्टाग्राम पोस्टमधून व्यक्त केल्या होत्या.