का साजरा केला जातो ‘प्रजासत्ताक दिन’?

नवी दिल्ली : देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र 1930 साली 26 जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचं जे अधिवेशन झालं, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचं निश्चित करण्यात आले होते.

स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस सुरु होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीनं राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आले. याच दिवशी लोकशाही पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात देशात झाली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आले. म्हणून याच दिवशी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.