एका “युवराज”ला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?

भाजप नेते आशिष शेलारांची संजय राऊत यांच्यावर टीका

मुंबई : अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून शिवसेना विरुद्ध भाजपा ेंअसा सामना रंगला आहे. याच प्रकरणावरून भाजपाने आता सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे व मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावरही टीकेचा बाण सोडला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन दिशा सालीयन बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी…, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका सिंह यांना परमवीर का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?, असं टीकास्त्र शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर डागलं आहे.

नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, ही भाजपा भूमिका स्पष्ट आहे. मात्र, नाईक परिवाराची केस दाखवून स्वत:चा सूड घ्यायचा राज्य सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. अशा बंद केसेस पुन्हा ओपन करण्यास लागलो, तर ठाण्यातील परमार बिल्डरची केसही ओपन करावी लागेल. त्या घटनेतल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांचे नाव आहे, त्यानुसार राज्य सरकारला पळता भूई थोडी होईल. या घटनेवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया द्यावी, असे शेलार यांनी गोस्वामींना झालेल्या अटकेनंतर पत्रकार परिषदेत म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.