गणेशमूर्ती शाडूचीच का?

श्रीगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पुणे शहरातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात पेणच्या सर्वांगसुंदर गणेशमूर्तींच्या जाहिराती आपल्याला दिसू लागल्या आहेत. या मूर्ती बनवण्याची कला पेणसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसून येते. बाराही महिने या मूर्ती बनवण्याचे काम सुरू असते. मात्र, त्यातही अलीकडच्या काळात “इको फ्रेंडली गणेशमूर्ती’ ही संकल्पना समाजामध्ये रूजू लागली आहे. गणेशमूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस या दोन प्रकारचा कच्चा माल वापरला जातो.

सध्या शाडूच्या मूर्तींबाबत अधिक जागरूकता दिसून येत आहे. उत्सवातील गणेश मूर्ती ही पार्थिव मूर्तिपूजा असते. या मूर्तीची स्थापना आणि विसर्जन असेच स्वरूप असते. या उत्सवात दीड, तीन, पाच, सात आणि दहा दिवस श्री गणेशाची आराधना केली जाते आणि त्यानंतर मूर्तीचे स्वागत जसे वाजतगाजत केले जाते तसेच विसर्जनही मिरवणुकीने किंवा बाप्पा मोरया अशा जयघोषातच केले जाते. मात्र, विसर्जनानंतर महानगरांमध्ये पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे जे
विदारक स्वरूप समोर आले आहे, ते आपल्या जलस्रोतांसाठी घातक प्रदूषणकारी आहे आणि त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती संकल्पना पुढे आली आणि आता बहुतेक ठिकाणी रुजत आहे.

या पर्यावणपूरक श्रीगणेशाच्या मूर्तीसाठी शाडूच्या मातीचा वापर केलेला दिसून येतो. ही माती विशिष्ट प्रकारची करड्या रंगाची असते. सौराष्ट्रातून पोरबंदर, भावनगर या भागातून ही
माती आणली जाते. या मातीचे खडक येथील नदीच्या ठिकाणी मुबलक सापडतात. सध्या
या मातीचे गोळे गणपती बनवण्यासाठी विकत मिळतात; पण ही माती तयार करण्याची
प्रक्रिया वेगळी आहे. गुजरातमधून येणाऱ्या या मातीचे खडक फोडून ते बारीक दळून त्याची
पावडर तयार केली जाते. ही माती भिजवल्यावर मुलायम होते. या मातीमध्ये “वॉटर लॅण्डिंग
कपॅसिटी’ (पाणी धारण करण्याची क्षमता इतर मातीच्या तुलनेत जास्त असते. त्याचप्रमाणे
“टेन्साइल स्ट्रेन्थ’ही (इतर मातीच्या तुलनेत मातीचे तुकडे पडत नाहीत) मातीमध्ये उत्तम
आहे, त्यामुळेच ही माती गणेश मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

शाडूच्या मातीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे- ही माती भिजवल्यावर किंवा मळल्यावर एक चांगला गोळा बनवला जातो आणि या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासाठी थोड्या थोड्या मातीचा वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही माती हाताला किंवा साच्याला चिकटत नाही. ती वळवावी तशी वळवली जाते, अगदी या मातीपासून सहज कॉईलचा आकारही देता येतो आणि तो वाळल्यावर तसाच्या तसाच राहतो, त्यामुळे गणपतीची सोंड, मांडी, हात बनवणे सोयीस्कर ठरते. याबरोबरच या माती वाळल्यावर चिरा पडू नये यासाठी कापूस घातला जातो, तिच्यात घट्टपणा येतो, त्यामुळे मूर्ती हाताळणेही सोपे जाते.

एका छोट्या पाटावर मूर्तीची घडण करायला सुरुवात केल्यावर अगदी नवखा कलाकारही
मळलेल्या मातीच्या हातावर मूर्तीचे हवे तसे अवयव बनवून ते पाण्याच्या साह्याने आकार
देऊन मूर्तीच्या मूळ धडावर बसवू शकतात. मूर्तीवर वेगवेगळ्या प्रकारच्या कोरण्या बनवून
त्यापासून मूर्तीवर नक्षीकाम करणे, दागिने बनवणे, डोळ्याना आकार देणे, सोंडेवरील
कलाकुसर आदी सहजपणे आपण करू शकतो. कोरण्या बनवण्यासाठी घरात उपलब्ध
असलेल्या टूथपिक-आइस्क्रीम स्टीक अथवा फूटपट्टीही वापरता येते.

या मातीपासून गणपतीचे सुपासारखे कान अथवा इतर नाजूक अवयव बनवताना मातीत कापूस मिसळला तर इतर बनवताना या मातीचा व्यवस्थितपणे वापर करता येतो. ही माती मुळातच चिकट आहे, तिच्यात टिकावूपणा आहे, मात्र, मूर्तीच्या घडणीच्या वेळी सुरक्षितता लक्षात घेऊन आणि कुठे चिरा पडू नये अथवा भंगत्व येऊ नये यासाठी यात थोडा कापूस घातला जातो. यामुळे मूर्ती वाळल्यावर त्यावर रंगकाम करणेही अधिकाधिक सोपे जाते.

शाडू माती विघटनशील आहे. गणेशमूर्ती बादलीत विसर्जन केली तर अवघ्या एक-दीड
तासांत ती विरघळते. तिचे पाण्यात लगेचच वहन होते. तसे पीओपीचे होत नाही, त्यामुळेच
विसर्जनानंतर नदीकाठी किंवा समुद्रतीरावर मूर्तींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.
पोओपी जिप्सम या खनिज पदार्थापासून बनवले जाते. पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते
कडक होते आणि एकदा कडक झाल्यावर ते अविघटनशील बनते, त्यामुळे गणेशमूर्तींच्या
विसर्जनानंतर जरी तो पाण्यात सोडला तरी पुढे कित्येक महिने आहे त्याच स्वरूपात
राहतो. गणेशमूर्ती ही पोकळ असते. तिचे विघटन झाले नाही तर या पोकळ भागांमध्ये
प्लॅस्टिकसारखे अनेक पदार्थ जाऊन बसतात आणि त्याचा परिणाम प्रदूषण वाढीवर होतो.
त्यासाठी शाडूच्या मातीचा गणपती असणे, महत्त्वाचे आहे.

– अभिजीत धोंडफळे


शाडू माती कुठे मिळेल?
मुख्य ऑफिस : 303, नारायण पेठ, पुणे – 411030
मो. : 9922404908

पिंपरी-चिंचवड ऑफिस : प्राईड प्लाझा, 1ला मजला, पिंपरी स्क्वेअर, पिंपरी, पुणे – 411018
मो.: 9922404909

सातारा ऑफिस : 39, कर्मवीर हौसिंग सोसा., न्यू राधिका रोड, सातारा – 415001
फोन नं.:02162-233341

अहमदनगर ऑफिस : सेंट मोनिका कॉलेज रोड, झोपडी कॅन्टीनजवळ, सावेडी, अहमदनगर-414003
फोन नं.: 0241-2324081

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.