थिरुवनंतपुरम – केरळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे आहे. कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व असलेल्या या राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीसह देशभर मेट्रोचे जाळे उभे करण्यात तज्ज्ञ असलेले इंजिनियर ई. श्रीधरन अर्थात “द ग्रेट मेट्रोमॅन’ला भाजपाने आपल्या पक्षात घेत, त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.
मात्र, प्रकल्प राबवणे निराळे आणि राजकारणात उतरणे निराळे, हेच बहुधा श्रीधरन यांना समजले नसावे. भाजपाच्या प्रचार मोहिमेमध्ये केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरचे त्यांचे रोड शो जोरदार होत असल्याने, आता आपण केरळचे मैदान मारले, असाच आविर्भाव श्रीधरन यांच्या चेहऱ्यावर सध्या दिसत आहे. मात्र, अजून मतदान आणि निकाल दूर आहेत, हेच यांना समजलेले नाही.
दरम्यान, एका खासगी वाहिनीसाठी एका पत्रकार महिलेने श्रीधरन यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले आणि या “मेट्रोमॅन’चा संयम सुटला. या माध्यमकर्मीने विचारले की, भाजपाची केरळसाठी धोरणे कोणती असतील? उत्तर भारताप्रमाणे येथे “लव्ह जिहाद’, गोहत्त्याबंदी तसेच भाजपाच्या उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत पक्षाची भूमिका काय आहे, असे प्रश्न तिने विचारले असता, मेट्रोमॅन भडकले आणि मुद्दामहून खिजवण्यासाठी तू असले प्रश्न विचारत आहेस, असे सांगत, श्रीधरन उठून निघूनही गेले.
“I can’t understand this”: Shri E Sreedharan wants to be in politics without having to deal with political questions! THIS is the BJP’s ideal candidate? https://t.co/M6zDXimXq0
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 29, 2021
हा व्हिडिओ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीटरवर शेअर केला असून, “श्रीधरनजी, ऐसा कैसा चलेगा?” असा प्रश्न विचारला आहे. “ई. श्रीधरन को गुस्सा क्यों आता हैं?’ असे विचारत अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.