“अजूनही आपण धडा का घेत नाही”; CBSE परीक्षांवरून प्रियांका गांधींचे सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाची दुसरी लाट आपले हात पाय पसरताना दिसत आहे. रोज नव्याने आकडेवारी समोर येत आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा  अत्यंत महत्वाचा असून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याविषयी सरकारचा विचार सुरु आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाच्यासंदर्भात  प्रियांका गांधी  ट्विट करत मुद्दा उपस्थित केला आहे. “सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे की या परीक्षा ऐन करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घेतल्या जात आहेत. त्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. आपण धडा का घेत नाही आहोत? बंद जागांमध्ये एकत्र येण्यामुळे कोविडचा प्रसार होतो. दुसऱ्या लाटेनं मुलांना करोनाच्या नव्या विषाणूची लागण लवकर होऊ शकते हे दाखवून दिलं आहे”, असे प्रियांका गांधींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये प्रियांका गांधी पुढे म्हणतात, “करोनामुळे विद्यार्थी आधीच प्रचंड तणावामध्ये आहेत. त्यात त्यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी घालून परीक्षा हॉलमध्ये बसण्याची अपेक्षा करणं हे असंवेदनशील आणि अन्यायकारक आहे. त्यातल्या अनेकांच्या कुटुंबातील व्यक्तींना करोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. ते आधीच खूप साऱ्या तणावात आहेत. अनेक महिने निर्णय घेणं लांबवल्यानंतर या परीक्षा अशा काळात घेण्यामागचं कारण मला समजत नाहीये”.

दरम्यान, या ट्विट्समध्ये प्रियांका गांधी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. “मी याआधीही हे सांगितलं आहे आणि आत्ता पुन्हा एकदा सांगते. मुलांचं मानसिक आरोग्य हे त्यांच्या शारिरीक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. आता वेळ आली आहे की आपल्या शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या भल्याकडे संवेदनशील दृष्टीने बघायला हवं आणि या समस्या गांभीर्याने घ्यायला हव्यात”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.