पुणे – संघटनात्मक नियुक्तीमध्ये डावलण्यात आलेल्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीत आम्हाला संधी का नाही, असा प्रश्न ते विचारत आहेत.
गेली 15 ते 20 वर्षे हे निष्ठावान पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने शहरात कार्यरत आहेत. तसेच पक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या जबाबदाऱ्याही त्यांनी कोणतेही कारण न देता पार पाडल्या आहेत. असे असतानाही आम्हाला प्रत्येक वेळी पक्षसंघटनेतून डावलले जात असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे मुख्यमंत्री असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठी संधी आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पक्षाचे नुकसानच होणार असल्याची चर्चाही या नियुक्तीवरून सुरू आहे.
या नियुक्त्या करताना जेष्ठांना विश्वासात न घेतल्यामुळे अशा पद्धतीने चुकीच्या निवडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पक्ष प्रमुखांकडे तक्रार करुन दाद मागणार असणार असल्याचे निष्ठावान कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत.