जावयाचे खापर सासऱ्यावर का फोडता? जयंत पाटलांचा सवाल

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले आहे. दरम्यान, याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पत्रकार परिषदेद्वारे भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही, पण सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी नि:पक्ष चौकशी करावी. जावयाने काय केले, त्याचे खापर सासऱ्यावर का फोडता, असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

केंद्र सरकार दबावाचे राजकारण करत आहे, हे जगजाहीर आहे. देशाच्या जनतेला हे सगळे कळत आहे, अशीही टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. कोणीच कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. या प्रकरणात कोणताही भेदभाव न करता कारवाई व्हायला हवी. कायदा त्याचे काम करेल. मला पूर्णपणे न्यायसंस्थेवर विश्वास आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक दोन प्रकरणात अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडेच राज्याचे गृहखाते असल्याने या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काय कारवाई करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.